गुळुंचे येथे ज्योतिर्लिंगाची यात्रा…. अंगावर काटे आणणारी ” काटे बारस’… श्रद्धाळू भाविकांनी घेतल्या एकापाठोपाठ एक काट्यांच्या फासात उड्या.
.
जेजुरी, दि.५ पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे आज ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाची यात्रा संपन्न झाली. श्रद्धाळू भाविक यात्रेत हार हार महादेव ची गर्जना करीत अक्षरशः काट्यांच्या फासात उड्या घेत असतात. आज दुपारी दोन वाजता ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची मुक्त हस्ताने उधळण करीत उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या फासात पाण्यात सूर मारावे तसे, बेधडक उड्या घेत होते. हा रोमांचक सोहळा अक्षरशः अंगावर काटा आणणारा होताच, मात्र राज्यभरातील हजारो भाविकांनी हा थरारक सोहळा अनुभवला.
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या कार्तिक शुद्ध द्वादशीची काटे बारस यात्रा राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यभरातून येथे भाविक येतात. दिवाळी च्या लक्ष्मीपूजनापासून बारा दिवस चालणाऱ्या यात्रेची बारशीला सांगता होते. लक्षमीपूजनापासून घट स्थापना होते
दररोज नियमित छबिना व धार्मिक कार्यक्रम होत असतात. येथील महिला १२ दिवसांचा उपवास ही धरतात.
एकादशीला ज्योतिर्लिंगाची पालखी नीरा स्नान उरकून मंदिरात येते. बारसेला ग्रामप्रदक्षिणा घालून ज्योतिर्लिंगाचा पालखी सोहळा बहीण ‘काठी’ ची ढोल, ताशा, टाळ मृदंगाच्या गजरात भेटून माघारी येते. यावेळी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांत देवाचा संचार होतो. ते भाविक काट्याच्या फसातून लोटांगण घालून मंदिरातील देवाची भेट घेत असतो. भक्ती आणि शक्तीच्या या सोहळ्यात डॉक्टर, इंजिनीअर, वकील या शिक्षित भविकांसह पाच वर्षापासून ते ८० वर्षाचे भाविक सहभागी होतात.
आज दुपारी हा रोमांचक सोहळा पार पडला. आणि यात्रेची सांगता झाली.