गरिबांची दिवाळी होणार गोड, यावर्षीही १०० रुपयांत आनंदाचा शिधा , मैदा पोह्यांचा ही समावेश
मुंबई, दि. ५ ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यावेळी देखील राज्य सरकारने दिवाळीला नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा आनंदाचा शिधा देताना त्यात मैदा आणि पोहे यांचाही समावेश असणार आहे, त्यामुळे सामन्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे
मंत्रिमंडळ बैठकीतील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.
इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा.
गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना ९०टक्के शासन अनुदान.
सोयाबिन पिकाबाबत महत्वाचे निर्देश : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र बैठकीला अनुपस्थित होते राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक ही राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीविना पार पडली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी अजित पवार यांची तब्येत ठिक नसल्याचे सांगितले.