कोयत्याने वार करीत लातूर जिल्ह्यात लाखाची लूट, मात्र आरोपी जेजुरीत जेरबंद. जेजुरी पोलिसांची कामगिरी…
जेजुरी, दि.१० लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पिग्मी एजट अच्युत शेळके यांची दुचाकी गाडी अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने चोरून नेवून फरार झालेल्या शुभम जाधव या आरोपीस जेजुरी पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील एका शेतात जेरबंद केले.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे दि.८ रोजी पिगमी एजंट अच्युत शेळके हे एजेंशीचे पैसे गोळा करून घरी जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील एक लाखाची रक्कम लुटून आरोपी शुभम जाधव हा फरार झाला होता. सदर आरोपी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगर भागात असणाऱ्या पिंगोरी गावातील एका नातेवाईकांच्या शेतात लपून बसला होता. याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली.
बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभागाचे पोलिस आधिकारी तानाजी बरडे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे,पोलीस हवालदार दशरथ बनसोडे,प्रशांत पवार,राहुल माने,योगेश चीतारे या पोलीस पथकाने या आरोपीस सापळा लावून पिंगोरी शिताफीने जेरबंद केले आहे. सदर आरोपी एका शेतात लपून बसला होता.पोलिसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. या आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याचे जेजुरी पोलिसांनी सांगितले.