कुठे बसायचं आणि कुठे नाही, हे मला समजते सुपर सीएम टीकेला खा.श्रीकांत शिंदेंचे उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीत श्रीकांत शिंदे त्यांच्या खुर्चीवर बसले असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो शेअर केला होता. यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या पाठीमागे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री असा बोर्डही होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपर सीएम म्हणत टीका करण्यात आली आहे. यालाच आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हा फोटो व्हायरल झाला आणि त्यावरुन वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. या वादानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे आपल्या घरातलं कार्यालय आहे, असं स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत.१८ – २० तास काम करतात, कोणालाही त्यांचा कारभार सांभाळण्याची गरज नाही. फोटोमधलं कार्यालय घरातलं आहे. मी आणि शिंदे साहेब दोघेही याचा वापर करतो.
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, “साहेब मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून आम्ही हे कार्यालय वापरतो. तिथे अनेक लोक येतात. आम्ही शासकीय घरात, किंवा कार्यालयात बसलेलो नाही. हे केवळ आम्हाला बदनाम करायचं काम आहे. हे आमचं ठाण्यातलं घर आहे, आम्ही वर्षानुवर्षे इथे बसतो, लोकांच्या गाठीभेटी घेतो. हा बोर्ड इथं तात्पुरता ठेवला आहे. शिंदे साहेबांची आज एक व्हीसी होती. त्याची तयारी म्हणून हा बोर्ड इथं ठेवलेला. फोटो काढणाऱ्याने बरोबर तो अँगल पकडून फोटो काढला. आधीसारखा अनुभव आता नाही, आता मुख्यमंत्री फिरतीवर असतात. जिथे वेळ मिळेल तिथून ते काम करत असतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी घरात ही व्यवस्था करण्यात आली होती. यातून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. या गोष्टी अनावधानाने झाल्या असतील. मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठे बसायचं आणि कुठे नाही हे मला कळतं..