काहीजण पक्ष सोडून गेल्याने काहीही फरक पडणार नाही – संदीप चिकणे
जेजुरी, दि.९ पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाची ताकद सर्वात जास्त आहे. पक्षकार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात पक्षाचे काम करतात मात्र काहीजणांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. ज्यांना पक्ष सोडायचा होता त्यांनी सोडला म्हणून पक्षाची ताकद कमी होईल असे कोणी समजू नये असे प्रतिपादन पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकने यांनी केले आहे.
येत्या १७ तारखेला पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या प्रयत्नातून पुरंदर तालुक्यात सासवड येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा आणि युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची तालुका पक्ष संघटनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मेळावा यशस्वी होण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अशातच पक्षाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर बोलताना श्री चिकणे यांनी यामुळे पक्षावर कोणताच परिणाम होणार नसून उलट येत्या मेळाव्याला पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळेल असे ही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येत्या १७ तारखेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही संदीप चिकणे यांनी केले आहे