काँग्रेस अध्यक्ष कोण बनणार?; १७ ऑक्टोबरला होणार निवडणूक, राहुल गांधींना पसंती
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचच लक्षं लागलं आहे. अशात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पहिली पसंती दिली आहे. मात्र, अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या नावाला विरोधही आहे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावालाच पहिली पसंती दिली आहे. अध्यक्षपदासाठी राहुल हेच ‘पहिले’ आणि ‘एकमेव’ पर्याय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खुर्शीद यांनी ही माहिती दिली . परदेशातून आल्यानंतर अध्यक्षपदासाठी राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही खुर्शीद म्हणाले.
अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास राहुल गांधींचा नकार
राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची धूरा गांधी परिवारातील बाहेरच्या नेत्याकडे जाणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीचे वेळापत्रक
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. याबाबतची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवली जाईल. तर मतमोजणी १९ ऑक्टोबरला पार पडणार आहे.