करवीर छत्रपती इंदुमतीराणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथामुळे नवीन पिढीला इतिहासाचे दर्शन होईल :- श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
सासवड, दि.३ (प्रतिनिधी ) सासवड येथील जगताप घराण्यातील कन्या व करवीर छत्रपती संस्थांच्या सुनबाई इंदुमतीराणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथामुळे नवीन पिढीला इतिहासाचे दर्शन होईल असे प्रतिपादन श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी सासवड येथे केले. डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी लिहिलेल्या इंदुमती राणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी करवीर छत्रपती इंदुमतीराणीसाहेब स्मृतिदिन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक माजी आमदार दिलीप आबा साळुंखे पाटील होते. पुरंदरचे आमदार संजय चंदूकाका जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सासवड येथील महापराक्रमी श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान व समस्त सासवडकर ग्रामस्थ यांच्या वतीने प्रकाशन कार्यक्रम सासवड नगरपालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. यावेळी, बोलताना युवराज्ञी संयोगीता छत्रपती यांनी, करवीर छत्रपती इंदुमतीराणीसाहेब यांना वयाच्या अकराव्या वर्षी वैधव्य आले., तरीही श्रीमंत शाहू महाराजांनी त्यांना शिक्षण दिले व स्वावलंबी केले. इंदुमती राणीसाहेबांनी हेच कार्य पुढे चालू ठेवून मुलींनी स्व:ताच्या पायावर उभे रहावे यासाठी प्रयत्न केले. असे शाहू महाराज व इंदुमतीराणीसाहेब आजच्या युगात आवश्यक आहेत असेही श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या. यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी, इंदुमती राणीसाहेब यांच्याबाबत अजून काही माहिती आवश्यक असल्यास ते देण्यास सहकार्य करु असे सांगितले. अध्यक्ष पदावरुन बोलताना माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी, मराठ्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सध्या सुरु असून मराठ्यांचा खरा इतिहास लोकांपुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषद सदस्य रावसाहेब पवार यांनी, इंदुमतीराणीसाहेब यांचे इतिहासातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नाही. या पुस्तकात काही माहिती अजूनही आवश्यक आहे.
यावेळी भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्ष संगिताराजे निंबाळकर, लेखिका सुवर्णा नाईक निंबाळकर, पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रकाशक अखिल मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ दिपक जगताप यांनी प्रास्ताविक केले, संतोष एकनाथ जगताप यांनी श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान यांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी संजय जगताप, मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ.वृषाली जगताप, दिपक माधवराव जगताप व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले.
कार्यक्रमास सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, माजी नगराध्यक्ष प्रमोददादा जगताप, मार्तंड भोंडे, माजी उपाध्यक्ष यशवंतकाका जगताप, वामनतात्या जगताप, राष्ट्रवादीचे नेते बंडूकाका जगताप, माजी जि प सदस्य हेमंतकुमार माहुरकर, नंदकुमार जगताप, महेश जगताप, पै मोहन जगताप यांसह विद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सासवडकर नागरिक उपस्थित होते. सागर जगताप यांनी आभार मानले.