कदमवस्ती शाळेत वाढदिवसानिमित्त बंधुभावाचा संदेश…
जेजुरी दि. २२ : साकुर्डे बेलसर (ता.पुरंदर) येथील कदम वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कडून आपल्या पाल्याचा जन्मदिवस साजरा होत असताना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालाउपयोगी साहित्यांचे वाटप, पुस्तकांचे वाटप, नाश्ता, गोड खाऊ, जेवण यांचे वाटप करीत एकात्मतेचा, बंधुभावाचा संदेश देण्याचा अभिनव उपक्रम पहावयास मिळत आहे.
कदमवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर शाळा असून अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये या शाळेचे विद्यार्थी चमकले जातात तर येथील शिक्षकांनाही राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी या शाळेच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षणासहित वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याचे पालकाच्यांकडून सातत्याने स्वागत होते. यामुळे विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश यासाठी पालकांच्यात मोठी चढाओढ पहावयास मिळते.
नुकताच या शाळेतील विद्यार्थी कृष्णराज कामथे व शुभ्रा गायकवाड यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी यानिमित्ताने पालक पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळुन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पंचपक्वानाचे स्वादिष्ट भोजन देत शाळेच्या नव्याने होत असलेल्या इमारतीमध्ये एका वर्गाचे शैक्षणिक उपक्रमाचे सुशोभीकरणासाठी सर्व आर्थिक मदत केली.
यावेळी हा धनादेश वाळुंज केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांचे हस्ते देण्यात आला.
यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बी.एम.काळे, सचिव अमोल बनकर,कार्यकारिणी सदस्य निखिल जगताप,प्रकाश जगताप,रंजना कामथे, कविता कामथे,अश्विनी कामथे यांच्यासह पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थी अनुष्का वाघ, स्वरूप जगताप, जानवी कदम,अन्वी जाधव ,शिवांश धायगुडे, स्वरा बनकर, सिद्धेश हिंगणे, ईश्वरी हिंगणे, आराध्या चव्हाण, काव्य सोनवणे, वरद सस्ते, पृथ्वीराज कामठे यांनी या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या .या शुभेच्छा देत असताना या सर्व चिमुकल्यांनी ज्यांचा जन्मदिवस आहे त्या भावंडांचे गुणदोषाचा अभ्यास करत त्यामध्ये चांगले वाईट बदल करण्याच्या सूचना केल्या तर आपण आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबियांचे स्वप्न , इच्छा आकांक्षा पूर्ण करावेत अशा शुभेच्छा दिल्या. या सर्व लहान चिमुकल्यांनी आपल्या सवंगड्यांचे केलेले निरीक्षण करून दिलेल्या प्रगल्भ शुभेच्छा पाहून सर्वजण भारावून गेले .
आमची मुले या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असल्याचा आम्हाला निश्चित अभिमान असून मुलांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर मुलांना, दुसऱ्यांचे घेत असताना आपलेही दिले पाहिजे हे शिक्षकांनी रुजवलेले संस्कार कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात हे विचारांचा आदर्श ठरतील असे योगेश कामथे यांनी सांगितले.तर या शाळेत मिळणा -या गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळेच येथील पालक शाळेसाठी मदत करत आहेत तर वाढदिवसाच्या निमित्ताने होणा-या उपक्रमातूनच विद्यार्थ्यांच्यात एकीची भावना, एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागत असल्याचे बी. एम. काळे यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सहशिक्षिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
“जाधव दांपत्य आठ नऊ वर्षांपूर्वी येथे आले, त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्रित करीत शाळेची गोडी लावली व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शिदोरी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवली. यातूनच या शाळेला अनेक आय.एस.अधिकारी, शिक्षण तज्ञ यांनी भेट देऊन या मुलांचे कौतुक केले आहे. निश्चितपणे एक दिवस पुरंदर तालुक्यातील कदमवस्तीची ही शाळा वाबळेवाडी सारखीच राज्यात आदर्शवत ठरेल. “
अनिल जगदाळे, केंद्रप्रमुख वाळुंज.