एका दगडात दोन पक्षी…… उद्धव ठाकरे यांची अनोखी राजकीय खेळी..
नाशिक दि.२३ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला मोठा झटका देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना त्यांच्याच मतदारसंघात शह देण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. मालेगावातील भाजपचे युवा नेते अद्वय हिरे ठाकरे गटात जाणार असल्याचं निश्चित झालंय. हा भाजप आणि शिंदे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय. कारण हिरे कुटुंबाचं गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. हिरे कुटुंबातील अद्वय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं स्थानिक पातळीवरील पारडं जड होण्याची शक्यता आहे. अर्थातच त्याचा फटका भाजप आणि शिंदे गटाला बसेल.
”गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. मालेगावात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप आणि शिंदे गटाने कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधला रोष वाढत होता”, असं अद्वय हिरे म्हणाले.
भाजपच्या वरिष्ठ सर्व नेत्यांच्या कानावर इथली परिस्थिती टाकून देखील त्याचा कुठलाही परिणाम मात्र झाला नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.
“शिंदे गट आल्यापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांना विशेष स्थान मालेगावत राहिले नाही. सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत होती. त्यामुळे आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोडचिठ्ठीचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया अद्वय हिरे यांनी दिली.
“सर्व कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंसोबत जाऊन शिवसेनेबरोबर राहून संघर्ष करावा, अशी मागणी होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पन्नास मतदारसंघातील सच्चे कार्यकर्ते नाराज असून त्यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही”, असं अद्वय हिरे म्हणाले.
“माझे आजोबा, वडील आणि माझ्याबरोबर तिसऱ्या पिढीपासून असलेले सर्व कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेत. २७ ते २८ तारखेला सेना भवनात प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे”, अशी माहिती अद्वय हिरे यांनी दिली.