इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून हनिट्रॅपमध्ये अडकला काँग्रेस नेत्याचा मुलगा…
पुणे, दि.२२ ( प्रतिनिधी) मध्य प्रदेशमधील इंदूर येथील काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवकाच्या मुलाला हनिट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून १२ लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नेत्यांच्या मुलाची सोशल मीडियावरून एका तरुणीशी मैत्री झाली होती. त्यानंतर सदर तरुणीला भेटण्यासाठी तो हॉटेलमध्ये गेला. त्यादरम्यान तरुणीने या तरुणाचा व्हिडीओ बनवला. तसेच नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ही तरुणी तिच्या सहकाऱ्यांसोबत मिळून आणखी पैसे मागू लागली. तेव्हा या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. आता विजयनगर पोलीस ठाण्यातील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण शहरातील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे. ठाणे प्रभारी रवींद्र सिंह गुर्जर यांनी सांगितले की, उज्जैन येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा मुलगा महेश टटावत हा हनिट्रॅपची शिकार झाला आहे. त्याने नोंदवलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, इन्स्टाग्रामवरून त्याची मैत्री एका तरुणीसोबत झाली होती. यादरम्यान, त्याने महेशला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पीडीत महेशने पोलिसांना सांगितले की, त्याने आतापर्यंत १२ लाख रुपये या तरुणीला तडजोड म्हणून दिले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा तरुणीची पैशांची हाव वाढल्याने त्याने पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. आरोपी तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करण्यात आल्यावर महेश याने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. ब्लॅकमेलिंगचा शिकार झालेल्या महेशने या तरुणीची पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित जमीनही विकली होती.