इंदापूर बारामती सह पुणे जिल्ह्यात जनावरांना लंपी स्कीन आजार…! गोपालकांनी दक्षता घेण्याची गरज…
जेजुरी, दि.४ (प्रतिनिधी) राज्यातील जळगाव जिल्ह्यानंतर आता पुण्यासह अहमदनगर, धुळे, अकोला, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, सातारा, बुलडाणा, बीड अशा १२ जिल्ह्यांमध्ये जनावरांमध्ये लंपी स्कीनची लक्षणे दिसू लागली असूिन आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील २ जनावरांसह राज्यात १३ जनावरे या आजाराने मृत्यू पावली आहेत.
राज्यातील १०२ गावांमध्ये लंपी स्किन रोग पसरलेला आहे अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागानेच जाहीर केली आहे. मात्र त्याहून अनेक गावांमध्ये हा रोग पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत ४९२ गावांमधील दीड लाखांहून अधिक जनावरांना या आजाराला प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात हा आजार वेगाने वाढू लागल्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. इंदापूर तालुक्यातही या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
काय आहे हा लंपी स्कीन आजार?
डास व रक्तशोषक किड्यांच्या चावण्यातून संसर्ग फैलवणारा हा आजार असून रोगाची लागण झालेल्या जनावरांना पोट पाठ मान, डोके, त्वचेवर गोलाकार व कडक गाठी येतात व काही दिवसांनी त्यातून स्त्राव होऊ लागतो. या आजारामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
जनावरे गाभण असतील, तर गर्भपात होतो. चारापाणी खात नाहीत. त्यामुळे जनावरे अशक्त बनतात. वेळीच लसीकरण झाल्यास मृत्यू रोखता येतो. देशात सुरवातीला राजस्थानात हा आजार आढळून आला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात व पालघर जिल्ह्यात याची लक्षणे जनावरांना आढळून आली.