आ.संजय जगताप यांच्या आंदोलनाची महावितरण कडून गंभीर दखल….. विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुरंदर तालुक्यात महावितरणकडून ‘एक गाव, एक दिवस’ योजनेची अंमलबजावणी
बारामती, दि. ५ ( प्रतिनिधी ) विविध वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या सासवड विभागामार्फत पुरंदर तालुक्यात आजपासून ‘एक गाव, एक दिवस’ ही योजना युद्धपातळीवर राबविली जात आहे. त्यासाठी महावितरणकडून दि. ५ जुलै ते २६ ऑगस्ट कालावधीचे ११५ गावांचे गावनिहाय वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमांतून महावितरण पुरंदर तालुक्यातील सर्व वीज समस्या सोडविणार आहे.
आमदार संजय जगताप यांचे सासवड येथे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाची महावितरणने गंभीर दखल घेतली असून, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना पुरंदर तालुक्यातील सर्व वीज समस्या सोडविण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे. तशा आदेशानुसार सासवड विभागाने कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे सासवड चे कार्यकारी अभियंता श्री वनमोरे यांनी सांगितले.
आज ५ जुलै पासून सासवड शहर व जेजुरी शहरापासून या योजनेची सुरुवात केली आहे. पुढील ५३ दिवस हा कार्यक्रम राबविला जाणार असून दररोज किमान दोन गावे याप्रमाणे ११५ गावे वीज समस्यांमुक्त करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. या योजनेतून नवीन वीज जोडण्या तात्काळ देणे, वीजबिल तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे, नादुरुस्त वीज मीटर तात्काळ बदलणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारणे, लूज गाळ्यांना ताण देणे, वीज रोहित्रांची व रोहित्र पेट्यांची दुरुस्ती करणे, त्याचे केबल बदलणे यांसह ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जागेवर निराकरण आदी कामे केली जाणार आहेत. याकामांमुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.