आ प्रशांत बंब यांच्या निषेधार्थ सासवडला शनिवारी शिक्षण संघटनांची निदर्शने – शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष प्रा. सागर यांनी दिली माहिती
जेजुरी, दि. १ गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या बाबतीत केलेली दुर्दैवी वक्तव्ये तमाम शिक्षकांचा अपमान करणारी असल्याच्या निषेधार्थ तसेच शासनाने ‘आमचे गुरुजी’ या उपक्रमा अंतर्गत शिक्षकांचे फोटो भिंतीवर लावण्याचे अनाकलनीय व अतार्किक आदेश दिले आहेत.या दोन्ही विषया विरोधात पुरंदर तालुक्यातील तमाम शिक्षक संघटना एकत्रित येत शनिवारी (दि.३ सप्टेंबर) निदर्शने व निषेध व्यक्त करणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहाण्याबाबतचा शासन निर्णय रद्द झाला असताना देखील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत.याबाबत खोटे दाखले देऊन शिक्षक घरभाडे वसूल करतात.अशी बंब यांनी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी व तमाम शिक्षकांचा अपमान करणारे असल्याच्या निषेधार्थ बंब यांचे विरोधात निदर्शने करणार आहोत.
तसेच सध्या राज्यातील शासक व प्रशासक यांचेकडून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व सुधारणांबाबत निरर्थक निर्णय घेत आहेत.
दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांनी व्ही.सी.द्वारे सर्व शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांचे” रंगीत फोटो” वर्गात भिंतीवर लावण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकांच्या प्रतिमा भिंतीवर टांगून शिक्षकांची “प्रतिष्ठा व स्वाभिमान” यास शासन कोणत्या प्रकारे अवमानित व सार्वजनिक चेष्टेचा विषय बनवित आहे? याचे भान संबंधितांना नसल्याचे उदाहरण आहे.
आम्ही फ्रेममधील बंदिवान शिक्षक नाहीत:”आमचे गुरुजी”हा बालिश निर्णय रद्द करावा यासाठी पुरंदर मधील सर्वच शिक्षक एकत्र येत निदर्शने व निषेध व्यक्त करणार आहोत असे सागर यांनी सांगितले.