आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत पालखीला एकत्र दिला खांदा

करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. असंच काहीसं चित्र पुण्यात आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्यानंतर पहायला मिळालं.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुण्यात असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली. दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.

दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.

आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले.

आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते तेव्हा बोलताना, “राज्यातील सध्याचे राजकारण खूप वाईट आहे. राज्यासाठी विकासासाठी असे राजकारण नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे राजकारण वाईट होत आहे,” अशी टीका केली. गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने राजकारणावर बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

“विसर्जन मिरवणुकीसाठी आल्याने राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी विकासासाठी नक्कीच चांगले नाही. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. निलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, अजित पवार भेटल. मात्र राजकारणा विषयी काही झाले नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page