आघाडीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षेची गरज- खा.सुप्रिया सुळे.
सासवड, दि.२५ ( प्रतीनिधी ) महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेली घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक असून ती अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून आपण केंदीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्वीटर द्वारे आपण महाराष्ट्रातील आघाडीच्या अमदारांनाही झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी केल्याचे खा
सुप्रिया सुळे यांनी सासवड येथे सांगितले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा.सुप्रिया सुळे काल दि.२४ रोजी पुरंदर तालुका दौऱ्यावर होत्या. दिवसभराचा दौरा उरकून सायंकाळी सासवड येथील पंचायत समितो सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी पुरंदर तालुक्यातील आदी अडचणींचा आढावा ही कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत घेतला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सौ.सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकार वर चांगलाच निशाणा साधला. गेल्या दोन महिन्यांपासून पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. विकासकामे पूर्ण होणे गरजेचे आहे. सातत्याने निर्णय बदलणारे हे सरकार म्हणजे ‘ यू टर्न सरकार’ आहे.
एकीकडे निर्णय बदलत राहायचे दुसरीकडे आघाडीच्या आमदारांना धमक्या द्यायच्या हे बरोबर नाही. आता विधानसभेत हेल्मेट घालून जावे की काय अशी उपरोधिक टीका ही त्यांनी केली.
गुंजवनी प्रकल्प, पुरंदरचे विमानतळ आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय बाजार याबाबत आघाडी सरकारच्या काळात सातत्याने बैठका झाल्या आहेत. आता मात्र सगळेच ठप्प झाले आहे.
विकास कोणाला नको आहे, विकास आणि समाज हिताच्या कामासाठी आमचा पक्ष २४ तास काम करतो आहे. त्यामुळे केव्हाही निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. असे ही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत आमचा न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास आहे. सत्य हे सत्यच असते. सत्याच्या च बाजूनं निर्णय होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदार संघात येणार आहेत अशी चर्चा आहे. या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, त्या केव्हाही येऊ द्यात, त्यांचे आम्ही अतिथी देवो भव असे समजून स्वागत करू, राहण्याची व्यवस्था ही करू. असे म्हटले आहे.